IMG-20210826-WA0090
कर्जत ताज्या नेरळ महाराष्ट्र सामाजिक

नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष

नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष

नेरळ/ नितीन पारधी :
रायगड जिल्हा परिषदेने नियोजित विकास साधण्यासाठी नगरविकास विभागाच्या सुचनेने नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले. मात्र आठ वर्षात या प्राधिकरण मधून ममदापूर नागरी भागातील रस्ते बनवले गेले आणि दरवर्षी प्रमाणे हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. दरम्यान, येथील खड्डेमय रस्त्यामुळे फ्लॅट खरेदी करणारे ग्राहक यांची वाट बिकट झाल्याने बहुतेक रहिवासी ममदापूर मध्ये न राहणे पसंत केले आहे.

नेरळ ममदापुर विकास प्राधिकरण नेरळ, ममदापुर आणि कोल्हारे येथील नागरी भागातील विकासाचे नियोजन करणार होते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर येथील विकासक यांच्याकडून नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरण गोळा करीत असते. मात्र 2013 पासून आतापर्यंत जेमतेम एक कोटी रुपयांचा निधी या भागातील विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे. प्राधिकरणच्या ममदापुर हा परिसर पूर्ण नेरळ ग्रामपंचायतचा भाग होता. मात्र नेरळ ग्रामपंचायत मधून बाजूला गेल्यानंतर विकासापासून 10 वर्षे बाजूला असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत मधील भागाचा विकास प्रामुख्याने नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर मार्गावर आला. आता त्याच नागरी भागात तब्बल 200 इमारती उभ्या राहिल्या असून तीन गृह प्रकल्प देखील उभे राहिले आहेत. परंतु या भागात नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरणकडून पायाभूत सुविधासाठी कोणताही निधी प्राधिकरण खर्च करीत नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने ममदापुर भाग हा नागरी भाग बाणण्याऐवजी समस्यांचे आगार बनले आहे. या नागरी भागातील चार किलोमीटर लांबीचे रस्ते एकदाही मजबूत पध्दतीने बनवले गेले नाहीत आणि त्यामुळे येथे घर खरेदी करून राहणारे लोकांचा प्रवास खड्ड्यातून सुरू आहे.


कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरून ममदापुर गावात जाणारा रस्ता जेथून सुरू होतो तेथूनच खड्ड्यातून प्रवास सुरु होतो. रायगड जिल्हा परिषद मालकीच्या नेरळ जुने पोस्ट ऑफिस ते ममदापुर आणि पुढे भडवळ या रस्त्याचे डांबरीकरण अनेक वर्षे झाले नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील रस्ता वगळता ममदापुर ग्रामपंचायत मधील मुख्य रस्ता नव्याने तयार होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यावेळी नागरी भागातील दोन मुख्य रस्ते हे देखील खड्ड्यात आहेत. नेरळ- ममदपूर रस्त्याने नागरी भागात जाणारा 40 फुटाचा रस्ता असून हा रस्ता आखाडावाडी पर्यत असलेल्या दिलकॅप कॉलेज पर्यन्त जातो. त्याचवेळी ममदापुर गावातील वस्तीला लागून असलेल्या 40 फूट रस्त्याची अवस्था खड्ड्यात गेलेल्या रस्त्यासारखी आहे. तर अंतर्गत दोन रस्ते वगळता सर्व रस्ते हे पावसाच्या पाण्यात हरवले आहेत. हे सर्व रस्ते नगररचना विभागाने तयार केलेल्या नियोजित भागातील रस्ते आहेत. त्यामुळे नागरी भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवले गेले नाहीत आणि त्यामुळे हे रस्ते खड्ड्यात हरवले आहेत. ममदापुर नागरी भागातील रस्त्यांबाबत नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरण आणि रायगड जिल्हा परिषद कडून कोणताही निधी खर्च केला जात नाही. परिणामी रस्त्यांअभावी येथे घर खरेदी करून राहणारे यांचा प्रवास खड्ड्यातून सुरू आहे, त्यामुळे अनेक रहिवासी घर सोडून आपल्या शहरात असलेल्या घरी राहायला गेले आहेत.
————————-

मुनिफ ठाणगे -स्थानिक रहिवासी
प्राधिकरणकडून ममदापुर नागरी भागात घर खरेदी करणाऱ्या रहिवाशी यांची फसवणूक झाली आहे.नियोजित विकास साधण्यासाठी बनवलेल्या नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरण आम्हाला रस्त्याची पायाभूत सुविधा देखील पुरवीत नाही.भरपूर इमारतींचा हा संकुल आहे,पण खेडेगावातील रस्त्यांसारखे पावसाच्या पाण्याने भरलेले हे रस्ते पाहून आम्ही घाबरतो.
——————–

श्वेता निळे -स्थानिक रहिवासी
नेरळ रेल्वे स्टेशन जवळ असल्याने आम्ही ममदापुर मध्ये घर खरेदी केले, परंतु काँक्रीटचे रस्ते, पाणी, सांडपाणी वाहून नेणारी गटारे, पथदिवे यापैकी येथे काहीही नाही आणि त्यामुळे आम्ही येथे घर घेऊन फसलो आहोत. आम्हाला या सुविधा ममदापुर ग्रामपंचायत पुरविणार आहे काय?
———————

आर एस देवांग-तांत्रिक अधिकारी, नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरण, अलिबाग
ममदापुर नागरी भागातील आणि गावातून जाणाऱ्या रस्त्याचे नियोजन रायगड जिल्हा परिषद आणि प्राधिकरण यांनी केले आहे. हे रस्ते कायमस्वरूपी मजबूत असावेत यासाठी प्राधिकरणचा प्रयत्न असून सर्व आराखडे तयार केले जात आहे. त्या सर्व प्रस्ताव यांना निधीची अडचण नाही, मात्र कागदोपत्री पूर्तता केल्यावर अंतिम स्वरूप येईल.

One thought on “नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 39 = 46