वंजारवाडी-भालीवडी आणि पोटल रस्त्याची दुरावस्था
नेरळ/ नितीन पारधी :
दोन वर्षापूर्वी भालीवडी- वंजारवाडी या रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते, मात्र रस्त्याच्या कामाचा दर्जा नित्कृष्ट असल्याने रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.तर त्या भागातील पोटल रस्त्याची अवस्था देखील दयनीय झाली असून रस्त्यांच्या स्थितीमुळे या भागातील रहिवाशांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.
कर्जत तालुक्यातील रस्त्यांची अवस्था महापुराने बिकट करून ठेवली आहे. पण तालुक्यातील भालीवडी- वंजारवाडी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने तून 2018 मध्ये करण्यात आले होते. मात्र हा रस्ता अल्पावधीत खराब झाल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा किती खराब होता हे रस्त्याची झालेली वाताहत यावरून दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि वाहनांचे हाल खड्ड्यांमुळे दयनीय होत आहेत. त्यात भालीवडी गावापासून पुढे पोटल ला जाणारा रस्ता देखील खड्ड्यात हरवला आहे. त्यामुळे टाटा कॅम्प भागातील वाहनचालक यांचे कंबरडे मोडण्याचे काम सुरू आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.
दरम्यान, रस्त्यांची स्थिती एक दोन वर्षात खराब झाली असल्याने शासनाने या रस्त्यांचे ऑडिट करावे आणि रस्त्याचे काम नित्कृष्ट करणाऱ्या ठेकेदारांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे. स्थानिकांना चांगला रस्ता असावा यासाठी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच शिवाजी बार्शी यांनी केली आहे.
————————-
रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेल्या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याची पाहणी केली जात असून पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहिली जात आहे.
– प्रल्हाद गोपणे, उपअभियंता.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग