Img 20220120 Wa0071
अलिबाग उरण कर्जत कल्याण कोकण कोल्हापूर खारघर ठाणे ठाणे नवी मुंबई नवीन पनवेल पनवेल पनवेल पालघर पुणे पेण महाराष्ट्र सामाजिक

राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी

राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले

पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा

खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी

पनवेल/ प्रतिनिधी :
नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली
पनवेल परिसरात नैना विरोधाची आग धगधगत आहे. नैना म्हणजे केवळ बिल्डरांचा विकास मात्र शेतकऱ्यांना भकास करणारे आहेत. यावेळी नैनाविरोधात एकत्र लढलो तर नक्कीच यश मिळेल. असे एडवोकेट विजय गडगे यांनी सांगितले. तर सांगडे येथील स्मशानभूमी भोकरपाडा येथे काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे येथील प्रेत २० किलोमीटरवर आनायच का ? अधिवेशनात आमदार नैनाचा प्रश्न उपस्थित करत नसतील तर रायगड मधील आमदार अधिवेशनात जातात कशाला ? नैनामुळे सध्या घर बांधताना देखील भीती वाटत आहे. सिडको धंदा करत आहे, व राजकीय पुढारी विकले गेले आहेत. त्यामुळे आपल्या गावाचा विकास आपण करू शकतो.
नैनामध्ये ज्या गावाची जागा गेली आहे त्यांना त्याच गावात जागा द्या अन्य गावात जागा कशाला देता, हे सर्व बेटरमेंट चार्ज मिळण्यासाठी केले जात असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. आपला फायदा करून घ्यायचा असेल तर संघटना मजबूत झाली पाहिजे. घरात बसून राहिलो तर नुकसान होईल, आपण सारे पेटून उठलो पाहिजे आणि या सरकारला घाम फोडला पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले. नैनाचा कारभार नियोजनशून्य असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात येवून गेल्या आठ वर्षापासून एकही वीट रचली नसल्याचे सांगितले. लवकरच काही गावांमध्ये शेकडो घरे तुटणार आहेत, याविरुद्ध आवाज उठवायला हवा. शासन झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरे देत आहेत मात्र घरात राहणार्यांना उध्वस्त करून झोपडीत राहायला पाठवणार आहे का असा सवाल यावेळी उपस्थितांमधून राज्य सरकारला करण्यात आला.
प्रकल्पग्रस्त, स्थानिक, भूमीपुत्रांना संपवण्याचाच प्रयत्न गेल्या काही वर्षापासून ‘नैना’चा देखील सुरू आहे. येत्या काळात होलिकेप्रमाणे ‘नैना’ देखील नेस्तनाबूद झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या रोजीरोटीवर, व्यवसायावर, पोटापाण्यासाठी उभारलेल्या धंद्यांना उद्ध्वस्त करण्याचे नियोजन करुन ‘नैना’ने मोठी घोडचूक केली. स्थानिकांना डिवचल्यानेच आज घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात ‘नैना’विरोधात प्रचंड संताप आहे. गावोगावी सध्या लाँग मार्चसंबंधी होत असलेल्या बैठकांतून जनभावना स्पष्ट होत आहेत. शेतकर्‍यांच्या, स्थानिकांच्या हिताचा विश्‍वास देऊन ‘नैना’ ने शेतकर्‍यांची फसवणूक केली. स्थानिकांचे म्हणणेच ऐकून घेतले जात नाही. दडपशाही, हुकुमशाहीचे धोरण अवलंबले जात आहे. बळजबरीने शेतकर्‍यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. आमच्या जमिनीवर आम्ही मोठ्या मेहनतीने व्यवसाय उभे केले. पै-पै जमा केली, प्रसंगी कर्ज काढले. सबंधित ग्रामपंचायतीकडे रितसर कर भरत आहोत. संबंधित व्यवसाय चालवण्यासाठी लागणारे परवाने सरकारनेच दिले. मग आम्हाला अनधिकृत ठरवण्याचा अधिकार यांना दिला कुणी? असा सवाल सामान्य नागरिक विचारु लागला आहे.
मुंबईचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई उभी राहिली. तेव्हा स्थानिक आगरी – कोळी भूमीपुत्रांच्या जमिनी सिडकोने कवडीमोल भावाने खरेदी केल्या. त्याबदल्यात आपल्याला काय मिळाले? हे जरा मागे डोकावून पाहिल्यास समजेल. आता नवी मुंबई देखील कमी पडू लागल्याने तिचा भार कमी करण्यासाठी ‘नैना’चा जन्म झाला. सिडको हे नाव जनमानसात प्रचंड बदनाम झाल्याने ‘नैना’ हे गोंडस नाव देण्यात आले. नवी मुंबईच्या निर्मितीमध्ये भूमीपुत्रांचा त्याग मोठा आहे. तिसऱ्‍या मुंबईच्या उभारणीमध्ये तर स्थानिकांवर अक्षरशः दडपशाही सुरू आहे. ‘नैना’ आली तेव्हा सक्तीचे कमीत कमी भूसंपादन असे धोरण ठरले होते. आता स्थानिकांचे व्यवसाय मोडीत काढून, लाखो रुपये भरण्यास सांगून त्यांच्या जमिनी सक्तीने विकत घेण्याचा डाव रचला जात आहे. गुन्हे दाखल केले जात आहेत, पोलीस बळाचा वापर केला जात आहे. जेणेकरुन स्थानिक हतबल होऊन गुडघे टेकतील. त्यामुळे गावोगावी ‘नैना विरोधी असंतोष खदखदत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर जाणूनबुजून आरक्षण टाकले असल्याचा आरोप केला जात आहे.
‘नैना’ला विरोध करण्यासाठी सुरूवातीलाच सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्याय करणाऱ्‍यांविरुद्ध बंड केले पाहिजे. आवाज उठवला पाहिजे. तरच अन्याय करणारे संपुष्टात येतील. अशी शिकवण देशाचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी दिली. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही, ते वाया जाऊही द्यायचे नसते अशा शब्दांत एकीचे बळ दाखवण्याचे आवाहन भूमीपुत्रांना प्रकल्पग्रस्तांचे नेते वाघ दि. बा. पाटील यांनी केले. या शिकवणीची प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आज आली आहे. ‘नैना’ ला थोपवून लावण्यासाठी भूमिपुत्रांनी एकजुटीची भींत बांधण्याची तयारी सुरू केली आहे.
शेतकऱ्यांना उध्वस्त करू पाहणाऱ्या नैना आणि अलिबाग-विरार कॉरिडॉर या प्रकल्पांचे भस्मासुर अक्राळ विक्राळ रूप धारण करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सावध होणे हि काळाची गरज बनली आहे. याच भूमिकेतून नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना एकत्र आणले आहे. नैना आणि अन्य प्रकल्प हे कितीही विकासाचे चित्र उभे करत असले तरीसुद्धा ते शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन कायमचे हिरावून घेणार आहेत, याचे भान शेतकऱ्यांना असले पाहिजे त्यामुळे तुटपुंजे मोबदला मिळणार असतील तर त्याला विरोध हा केलाच पाहिजे. तसेच पुनर्वसन सुद्धा आपल्या मागण्यांनुसार झाले पाहिजे, मात्र यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्यामुळे याच भूमिकेतून याच भूमिकेतून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.
तसेच नैना सारख्या मोठ्या आस्थापनांच्या समोर न झुकता थेट न्यायालयात त्यांना आव्हान द्यावे लागत आहे, आणि सर्व शेतकरी कृषी संघर्ष समिती ही जबाबदारी पार पाडत आहे. यावेळी राज फडके यांच्या सारखे उमदे कार्यकर्ते गावोगवी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत, परंतु आपल्यात एकी नसेल तर हे प्रयत्न व्यर्थ ठरण्याची भीती उत्पन्न होते म्हणून सर्व प्रकल्पग्रस्त बांधवांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी, विधान परिषद सदस्य आ.जयंत भाई पाटील, आ. बाळाराम पाटील, पनवेल नगरपरिषदेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके, सुरेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, प्रज्योती म्हात्रे, अनुराधा ठोकळ, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग, वामन शेळके, सुभाष भोपी, सुरेश पवार, राजेश केणी, अनिल ढवळे, नरेंद्र भोपी, नारायण पाटील, जगन फडके, सुदाम वाघमारे, बाळाराम फडके, डि के भोपी, बबन फडके, अनिल ढवळे, शेखर शेळके, सुरेश पाटील, रामचंद्र फुलोरे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थिहोते.