पनवेलच्या सेतू केंद्रात नागरिकांपेक्षा एजंटांचीच गर्दी जास्त?
सेतू कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींची चारित्र्य पडताळणी होते का याची पाहणी करणे गरजेचे आहे. कारण येथे काम करणाऱ्या काही जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
————————-
पनवेल /आदिवासी सम्राट : पनवेल तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात विविध दाखल्यांसाठी एजंटांचीच जास्त गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. जास्तीचे पैसे घेऊन एजंट सामान्य नागरिकांना लुबाडत आहेत.
पनवेल तहसीलदार कार्यालयाच्या खालील बाजूस सेतू कार्यालय आहे. या ठिकाणी शासनाची फी भरून विविध प्रकारचे दाखले मिळतात. जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर दाखले व इतर दाखल्यांसाठी एजंट लोक प्रत्येक दाखल्यासाठी जवळपास पाचशे रुपयांची मागणी करतात. सामान्य नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांना ताबडतोब दाखला काढून देतो असे सांगतात. सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या जोरावर हे एजंट त्यांचे काम साधून घेतात. मात्र सामान्य नागरिकाला दाखला देण्यास 45 दिवसांची मुदत देतात. अनेक पालकांना आपल्या पाल्यासाठी शाळेसाठी दाखला आवश्यक असतो त्यामुळे एजंट लोक याच संधीचा फायदा घेत नागरिकांकडून जास्त पैसे उकळतात. रेशन कार्ड साठी हजार रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे.
सेतू कार्यालयात सामान्य नागरिकाला वेगळी वागणूक मिळते आणि एजंटांना वेगळी वागणूक मिळते. पैसे देऊन काही एजंटाना तात्काळ दाखले देखील दिले जात असल्याचे समोर आले आहे. उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, नॉन क्रिमिलियर, जातीचा दाखला, वारस दाखला, स्थानिक वास्तव्य दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, 30 टक्के आरक्षण यासाठी केवळ 54 रुपये शासकीय शुल्क आहे. मात्र यासाठी येथील एजंट पाचशे रुपये पेक्षा जास्त पैसे आकारतात. तर रेशन कार्ड नाव वाढवणे, नाव कमी करणे, नावात बदल, दुकान बदली, उत्पन्न कमी, पत्ता बदल यासाठी 34 रुपये शुल्क आहे. केशरी कार्ड दुय्यम प्रत मिळण्यासाठी 74 रुपये शुल्क आहे.