मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर..
पनवेल कल्याण अंबरनाथ मधील ऊर्जा मार्गातून वीज प्रवाही ; उत्तम मोबदल्यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण
नवी मुंबई / आदिवासी सम्राट :
मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी कार्यान्वित असणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लि. यांच्या प्रकल्पाचे ठाणे जिल्हा आणि पनवेल तालुक्यातील काम पूर्ण झाले आहे. येथे उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्णत्वास येऊन त्यातून वीज प्रवाह सुरू झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशाला तब्बल दोन हजार मेगा वेट वीज या प्रकल्पाद्वारे मिळणार आहे. पुनर्वापर करता येण्याजोगी किंवा हरित ऊर्जा या प्रकारातील ही वीज असल्यामुळे सध्याच्या विजेच्या तुलनेत ती स्वस्त असणार आहे.
मुंबई महानगर प्रदेशाला सध्या ४५०० मेगा वॅट विजेची कमतरता भासत आहे. सध्याच्या काळातील विजेच्या उपकरणांचा वाढता वापर पाहता विजेची मागणी ही वाढतीच राहणार आहे. त्याच्या जोडीनेच सध्या वाहतुकीसाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर देखील प्रचंड वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ऊर्जा सक्षम होणे ही काळाची गरज बनली आहे. हीच निकड ध्यानात घेता देशाच्या ऊर्जा मंत्रालयाने अतिरिक्त वीज निर्मितीचे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. पारंपारिक ऊर्जा स्त्रोत हे ऊर्जा निर्मिती करता थिटे पडत असल्यामुळे नवनवीन ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्याची निकड भासते.
गुजरात राज्यातील कच्छ प्रांतातून सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांच्या मदतीने ऊर्जा निर्मिती केली जाते. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून ही ऊर्जा मुंबई महानगर प्रदेशात आणली जाणार आहे. ऊर्जा वाहून आणण्यासाठी तूर्तास असणारी यंत्रणा साधारणपणे सहा ते सात दशकांपूर्वीची आहे. म्हणूनच उच्च वीज वाहून आणण्याकरता या ठिकाणी नव्याने तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर केला गेला आहे त्यांना मनाप्रमाणे मोबदला मिळालेला असून या जमिनी तहहयात शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. इतकेच नव्हे तर प्रकल्पाकरता वापरलेल्या जमिनींचा शेती, मळा, शेळी पालन, कुक्कुट पालन, फळ लागवड, फुले लागवड अशा व्यवसायांकरता वापर करण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे जमीनधारकांच्यात समाधानाचे वातावरण आहे.
——————
माझ्या जमिनीमध्ये दोन टॉवर टाकण्यात आलेले आहेत. माझी जितकी जमीन या प्रकल्पाकरिता वापरली गेली आहे त्याचा समाधानकारक मोबदला मला मिळालेला आहे. इतकेच नव्हे तर टॉवर उभारताना माझ्या जमिनीतील जे बांबू अथवा अन्य झाडे तोडावी लागली त्याचा देखील मला अतिरिक्त मोबदला मिळाला आहे. आजही माझी जमीन माझ्याच नावावर आहे माझ्या सात बारा उताऱ्यावर शासनाचा अथवा प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीचा शिक्का मारलेला नाही.
शंकर बाळू टेंभे,
शेतकरी, कल्याण तालुका.
————–
माझ्या जमिनीवर ज्या तारा टाकण्यात आलेल्या आहेत त्यातून वीज प्रवाह सुरू झालेला आहे. मी नुकतीच तारांच्या खाली
भातशेती केली. माझ्या भाताची कापणी झालेली असून आता या जागेवरती मी भाजीपाल्याची लागवड करणार आहे. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून मला माझ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला आहे.
नरेश शिवराम भोईर
शेतकरी, पनवेल तालुका.