पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना मिळणार रोजगारक्षम शिक्षणाची संधी..
मुंबई/आदिवासी सम्राट :
देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण प्रदान करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या वतीने एका अभिनव योजनेचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोजगार हमी देणारे शैक्षणिक कोर्स प्रदान करण्यात येतात.इंटर्नशिप असल्यामुळे लाभार्थींना शिक्षणादरम्यान एकत्रित भत्ता तसेच मानधन देखील देण्यात येते. याच योजनेच्या अंतर्गत खावडा ४ पार्ट सी ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर) यांच्या वतीने कार्यान्वित असणाऱ्या ऊर्जा पारेषण प्रकल्पांमध्ये पाच लाभार्थ्यांना सामावून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर इच्छुक लाभार्थ्यांनी लॉगिन करून सर्वप्रथम रजिस्टर करावयाचे आहे. त्यानंतर स्वतःचा आधार कार्डशी संलग्न असणारा मोबाईल नंबर व्हेरिफाय करायचा आहे. ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर इच्छुक लाभार्थ्यांनी समोर दिसणाऱ्या रकान्यांमध्ये त्यांची माहिती भरायची आहे. त्यानंतर मार्कलिस्ट आणि प्रमाणपत्र ब्राउझ करून अपलोड करायची आहेत. सरते शेवटी या सगळ्याचे कन्फर्मेशन पूर्ण झाल्यानंतर त्याची एक कॉपी काढून इच्छुक लाभार्थी आपल्यापाशी ठेवू शकतात.
याच संकेतस्थळावर लाभार्थी होण्यासाठीचे निकष आणि नियम देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे या योजनेमध्ये सहा महिन्यांचा अभ्यासक्रम असून प्रत्येक महिन्यासाठी पाच हजार रुपये स्टायपेंड देण्यात येतो. तर एकत्रित भत्ता म्हणून ६ हजार रुपये देण्याची तजवीज देखील या अभ्यासक्रमात आहे. देशातील सर्वोत्तम अशा आस्थापनांबरोबर काम करायची संधी मिळाल्याने लाभार्थी विद्यार्थ्यांना अनुभवाची एक भक्कम शिदोरी आयुष्यभरासाठी मिळते. या योजनेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.