20191111 101732
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

लॉजमध्ये दांम्पत्याने आपल्या चिमुकलीसह जीवन संपविण्याचा केला प्रयत्न

लॉजमध्ये दांम्पत्याने आपल्या चिमुकलीसह जीवन संपविण्याचा केला प्रयत्न

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरातील समीर हॉटेल व लॉजिंग आणि बोर्डींगमध्ये दोन दिवसासाठी राहण्यास आलेल्या एका दांम्पत्याने अज्ञात कारणावरुन किटकनाशकाच्या सहाय्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची 3 ते 4 वर्षाची मुलगी सुद्धा यात बाधीत झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या दोघांवर मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहशीम के.अ.रा.पुंजी, चिराटावुन्न व त्यांच्या बरोबर असलेली पत्नी लिजी कुरियन व त्यांची 3 ते 4 वर्षाची मुलगी हे दोन दिवसासाठी समीरा लॉजिंग व बोर्डींग येथे राहण्यास आले होते. अज्ञात कारणावरुन त्यांनी किटकनाशकाचा वापर करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. चेक आउटच्या दुपारी 12 वाजताच्या वेळेनुसार हॉटेलमधील कर्मचारी रूम पाहण्यास गेला. त्यावेळी ते राहत असलेल्या 101 रूमचा दरवाजा ठोठावला तरी आतून काही आवाज येत नसल्याने त्याने याबाबतची माहिती मॅनेजरला दिली व त्यानंतर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी हे दाम्पत्य व त्यांची 3 ते 4 वर्षीय चिमुकली बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे रुममध्ये आढळून आले व त्यावेळी किटकनाशकाचा उग्र वास रुममध्ये येत होता.
त्यामुळे संशयाची पाल चुकचुकल्याने मॅनेजरने तात्काळ पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. तातडीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे विजय तायडे व त्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी तातडीने या तिघांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हलविले.
परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुलीला मृत घोषित केले. तर दोघे जण बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. सदर दांम्पत्याने टोकाचा निर्णय का घेतला याबाबत ते शुद्धीवर आल्यावरच माहिती मिळणार आहे. या संदर्भात पोलिसांकडे असलेल्या फोन नंबर व इतर माहितीच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे सुरू आहे.