कर्नाळा बँकेत खाते उघडणार्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा!
भाजप प्रतोद अमित जाधव यांची मागणी
पनवेल/ प्रतिनिधी :
कर्नाळा अर्बन बँकेत ज्या ग्रामपंचायतींनी खाती उघडली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायतीमधील नैना प्रकल्पात होत असलेली बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब थांबवावीत, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रतोद अमित जाधव यांनी बुधवारी (दि. 17) जि. प.च्या सर्वसाधारण सभेत केली.
रायगड जि. प.ची सर्वसधारण सभा ‘शिवतीर्थ’मधील कै. ना. ना. पाटील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प.च्या अध्यक्ष योगिता पारधी होत्या. या सभेत भाजप प्रतोद अमित जाधव यांनी कर्नाळा बँकेत खाते खोलणार्या ग्रामपंचायतींचे पैसे अडकल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामपंचायतीचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत किंवा राष्ट्रीयीकृत बँकेत उघडावे असे शासनाचे आदेश आहेत. असे असताना पनवेल आणि उरण तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी कर्नाळा अर्बन बँकेत खाते उघडले. या ग्रामपंचायतींचे नऊ कोटी रुपये कर्नाळा बँकेत अडकले आहेत. त्याचा परिणाम ग्रामपंचायतींमधील विकासकामांवर होत आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाळा बँकेत खाते उघडले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जाधव यांनी केली.
पनवेल, उरण व खालापूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी कर्नाळा अर्बन बँकेत खाती उघडली आहेत. त्यांचे पैसे अडकले आहेत. या सर्वांची चौकशी केली जात आहे. ज्यांनी या बँकेत खाती उघडली आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सभागृहात दिली.
पनवेल तालुक्यातील उसर्ली ग्रामपंचायत नैना प्रकल्पामध्ये आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. बांधकामांना परवनगी नैना देते, पण येथील माजी सरपंचांनी बांधकामांना परवानगी दिली आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. या इमारतींमध्ये घर घेणारे लोक मध्यमवर्गीय आहेत. त्यांची फसवणूक होत आहे. ही फसवणूक थांबविण्यासाठी जी बांधकामे उसर्ली ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहेत ती ताबडतोब थांबवावीत, अशी मागणीही अमित जाधव यांनी या वेळी केली.