ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

३४ आरोपींच्या आवळल्या मुसक्या
पनवेल शहर, पनवेल ग्रामीण आणि भरारी पथकाची कारवाई

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल राज्य उत्पादन शुल्क विभाग हा प्रसिद्धीपासून दूरच राहत असल्यामुळे या विभागामार्फत होणाऱ्या कारवाई जनतेसमोर येत नाहीत. मात्र या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात असून त्यामाध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावर दंडात्मक महसूल उपलब्ध होत आहे. पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग, ग्रामीण पनवेल उत्पादन शुल्क विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने लॉक डाऊनच्या काळात म्हणजेच अवघ्या २२ दिवसात तब्बल ६६ कारवाया करून ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल अवैध मद्यसाठा हस्तगत तसेच उध्वस्त केला आहे. यावेळी एकूण ३४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कविभाग हा महाराष्ट्रात सर्वाधिक महसूल मिळवून देणारा असा विभाग असून या विभागाचे ब्रीदच संवर्धन करणारे आहे. संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय असे ब्रीद घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देशी, विदेशी मद्य तसेच ताडीवरील शुल्क आणि विक्री नूतनीकरणाच्या शुल्कापोटी वर्षभरातून महाराष्ट्रातून जवळपास २० हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. बऱ्याच वेळेला प्रसिद्धी माध्यमांपासून दूर असणाऱ्या या खात्यातील अधिकारी व कर्मचारी त्यांचे कामाचे १०० टक्के योगदान देताना दिसून आले आहेत. पनवेल शहर उत्पादन शुल्कविभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे, पनवेल ग्रामीणचे निरीक्षक वामन चव्हाण आणि भरारी पथकाचे निरीक्षक स्तवन गोगावले यांच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा माल हस्तगत तसेच उध्वस्त केला आहे.
अवघ्या २२ दिवसांच्या कालावधीमध्ये पनवेल ग्रामीणच्यावतीने निरीक्षक वामन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने १४ कारवायांमध्ये २लाख ५३ हजार ८६३ रुपयांचा मुद्देमालहस्तगत तसेच उध्वस्त केला आहे. यामध्ये हातभट्टी निर्मिती करीत असताना केलेल्या कारवाईमध्ये १ लाख १३ हजार 249 रुपयांचा मुद्देमाल तसेच 8 हजार 940 रुपयांची ताडी उध्वस्त करण्यात आली आहे. यावेळी पनवेल शहर उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे यांच्या पथकानेही 8 ठिकाणी हातभट्टी निर्मिती करणाऱ्यांवर तर 2 ताडी विक्री आणि 7 गावठी दारू विकणाऱ्यांवर कारवाई करून मुद्देमाल उध्वस्त करण्यात आला आहे. या दोन्ही विभागामार्फत ढाब्यांवर कारवाई करून अनुक्रमे 2 लाख 53 हजार 863 आणि 1 लाख 80 हजार 915 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यावेळी एकूण 6 तालुक्यांचे मिळून एक भरारी पथक हे पनवेलमध्ये असून त्याचा कार्यभार येथील निरीक्षक सत्यवान गोगावले यांच्याकडे असून यांच्या पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एकूण 31 कारवायांमध्ये 7 लाख 42 हजार 902 रुपयांचा माल हस्तगत करून 11 आरोपी ताब्यात घेण्यात आले. यावेळी भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेली कारवाई ही पेण, पाली, कर्जत, उरण, खालापूर आणि पनवेल तालुक्यांचा समावेश आहे, तर पनवेल ग्रामीणच्या हद्दीमध्ये पनवेल ग्रामीण भागासह कर्जत तालुक्याचा समावेश आहे. तर पनवेल विभागामध्ये पनवेल शहर, तळोजा, कळंबोली, कामोठे आणि खारघरचा समावेश करण्यात आला आहे.
आज पोलीस प्रशासनामार्फतही अवैध मद्य विक्रीला आळा घालण्यात आला असून पोलीस प्रशासनामार्फतही कारवाई सुरूच आहे. मात्र एका बाजूला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नेहमीच कारवाया होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. अवघ्या 22 दिवसात 66 कारवाया ह्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आल्या असून तब्बल 34 आरोपींच्या मुसक्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने आवळण्यात आल्या आहेत.

One thought on “राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या २२ दिवसात ११ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 4 = 5