20200911_074628
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी! ……………………… – कांतीलाल कडू

पांडुरंग रायकरांनंतर
संतोष पवारांचा बळी!
………………………………….
– कांतीलाल कडू
…………………………………

एक पत्रकार गेला म्हणून आकाश पाताळ एक करण्याची मुळीच गरज नाही. अशी सामान्य माणसं कोरोनामुळे किडी मुंग्यांसारखी मेलीत, मरतात. त्याचे कुणाला सोयरसुतक नाही, असा टाहो फोडणाऱ्या काही प्रवृत्ती पुण्याच्या पांडुरंग रायकर नावाच्या पत्रकाराच्या हत्येनंतर सोशल मिडियावर बरळताना दिसल्या. हो, ती हत्याच आहे. यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे झालेली ती हत्या आहे. आता कितीही चौकशीचा कुणी आव आणला आणि आदेश काढले तरी त्यातून रायकर यांना न्याय मिळणार नाही. त्यांच्यानंतर माथेरानचे पत्रकार आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संतोष पवार यांची सुद्धा आरोग्य विभागाच्या यंत्रणेने हत्याच केली आहे. तेथील डॉक्टरांना ऑक्सिजन सिलिंडर जोडता येवू नये याचा अर्थ काय? कर्जतमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करताना एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही आणि त्यामुळे राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा मृत्यू होतो.

एका समतोल विचारवादी पत्रकाराचा मृत्यू होतो हे केवळ त्या यंत्रणेचे अपयश ठरवून चालणार नाही तर याला येथील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तितकीच जबाबदार आहे. एक सामान्य माणूस मरतो त्याची वेदना असतेच. पण अशा असंख्य सामान्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा पत्रकार छातीचा कोट करून सदैव सीमेवरील सैन्यासारखा अनेकांना अंगावर घेत असतो. तो उपसतो डोंगर नागरी समस्यांचा आणि त्यात लपलेल्या राक्षसांना अंगावर घेत असतो. शत्रू वाढवत असतो नाहकपणे समाजाच्या पोषक वाढीसाठी. जो खरा पत्रकार असतो ना, तो असतो त्या बत्तीस प्रकारच्या वनस्पतींमधील एक संजीवनी. तो आपल्या गुणधर्म आणि तत्वांच्या रसातून अनेकांची दुखणी बरी करत असतो. मात्र, तोच जेव्हा यंत्रणेचा बळी ठरतो तेव्हा ते त्याचे एकट्याचे अपयश नसते. तो एकटा मरत नसतो. समाज यंत्रणेचा तो मृत्यू असतो.
संतोष पवार हा असाच कुणालाही दंश न करणारा पत्रकार. समतोल, विचारवादी, दोन पावले मागे राहून झेप घेणारा एक हसतमुख पत्रकार. तो सुद्धा यंत्रणेचा बळी ठरावा हे दुर्दैव आहे.
गणपतीच्या दरम्यान, त्याच्या भावाला कोरोना संसर्ग झाला. त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. घरातील इतर सदस्यांची चाचणी करण्यात आली. सुदैवाने ते निगेटिव्ह आले… तरीही सर्वांनी काळजी घेत घरीच विलगीकरण करून घेतले. यापेक्षा अधिक दक्षता काय घेतली जावी?
आज सकाळी संतोषला एकाएकी श्वास घेण्यास त्रास झाला. त्याला कर्जत येथे हलविण्याचा निर्णय झाला. हॉस्पिटलमध्ये आणले गेले. परंतु, रायगडच्या राजकीय साठमारीने पोखरलेल्या व्यवस्थेचा फटका त्यालाही बसला. रायगडात कोरोनाने कहर मांडला आहे. शासकिय आणि राजकीय यंत्रणा पिंडाला कावळा शिवावा, इतक्या सोपस्कारापुरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणि होणारे मृत्यू रोखण्यात त्यांना फारसे यश येताना दिसत नाही.
कर्जतला एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही हे केवढे अशोभनिय आहे. गेल्या सहा महिन्यात ही व्यवस्था करण्यात अपयश आल्याने पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि आमदार, खासदारांनी जरा आरशासमोर उभे राहून स्वतःलाच प्रश्न विचारावा की, संतोषच्या मृत्यूला कारणीभूत कोण आहेत? आणि म्हणूनच हे अपयश म्हणजेच हत्या आहे.
खा. सुनील तटकरे यांनी नेरूळच्या डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये संतोषला हलविण्याच्या सुचना दिल्या. सरकारी रुग्णवाहिका आणली. त्यात संतोषला स्ट्रेचरवर घेतले. दुर्दैव असे की, तेथील डॉक्टरांना म्हणे ती वायूची सपोर्ट सिस्टम जोडता आली नाही. डॉक्टरांना जमली नाही म्हणून रुग्णवाहिका चालकांना अनुभव असेल म्हणून सांगण्यात आले. त्यालाही जमले नाही. संतोषची प्रकृती ढासळत गेली. ऑक्सिजनची पातळी 55 पर्यंत घसरली आणि अनर्थ घडला. एक पत्रकार हकनाक गेला. आता सांगा दोष कुणाचा?
सामान्य माणूस असो की, पत्रकार, लोकप्रतिनिधी असो की समाज उद्धारक. बडे अधिकारी, सामान्य कर्मचारी. प्रत्येक जीव ही संजीवनी आहे. ती जपता येत नसेल तर ती राज्यसत्ता आणि शासकीय यंत्रणा काय उपयोगाची? आपल्या घरातील, कुटुंबातील, आप्तेष्ट जेव्हा हकनाक जातो, त्याचा बळी जातो तेव्हा प्रत्येकाला आभाळ कोसळल्यासारखे स्वाभाविकपणे वाटते. मात्र, चळवळीतील एखादा जीव गमावतो तेव्हा ती राष्ट्राची हानी ठरते. म्हणूनच जास्त दुःख होते. यंत्रणेचे अपयश ही हत्याच असते, जाणते-अजाणतेपणे केलेली. हे जर तत्वत: मान्य असेल राज्य शासनाला तर त्यांनी याकडे गांभीर्याने पाहून रायगडात पुढचे निर्णय घ्यावे. अन्यथा आज पत्रकार… उद्या एखादा लोकप्रतिनिधी… आणि कदचित अधिकारी अशा रितीने हकनाक गेल्यास आश्चर्य वाटायला नको. मृत्यूची ही मालिका रोखण्यासाठी तरी अंतर्मुख व्हायला हवे. जायचं तर सर्वांनाच आहे एकेदिवशी… पण दगाफटक्याने नव्हे… लढता लढता मरण आले तर तो जीव अमर राहील. मग तो कुणाचाही असो.

One thought on “पांडुरंग रायकरांनंतर संतोष पवारांचा बळी! ……………………… – कांतीलाल कडू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 2