IMG-20210716-WA0039
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वर आरटीओची द्रुतगती मोहीम ; नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई

मुंबई-पुणे एक्सप्रेस वर आरटीओची द्रुतगती मोहीम ; नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई

 

पनवेल/ संजय कदम :
 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देणार्‍या वाहन चालकांवर आरटीओ ने कारवाई केली. पनवेल पेण  पिंपरी चिंचवड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने ही मोहीम राबवून नियम मोडणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशाच प्रकारच्या मोहिमा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून राबवल्या जाणार आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. या वेगवान रस्त्यावर वेगमर्यादेचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्याचबरोबर  अवजड आणि इतर वाहनांकडून लेन  कटिंग केली जाते. त्याचबरोबर इतर वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या कारणाने अपघाताला एक प्रकारे निमंत्रण दिले जाते. काही दिवसांपूर्वी बोर घाटात अशाच प्रकारे भीषण अपघात घडला होता. दररोज लहान-मोठे अपघात द्रुतगती महामार्गावर होतात. यामुळे अनेकांचे नाहक बळी जातात. या सर्व दृष्टिकोनातून आरटीओ, वाहतूक आणि महामार्ग पोलिसांकडून सातत्याने जनजागृती आणि प्रबोधन केले जाते. तरीसुद्धा वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. या सर्व दृष्टिकोनातून परिवहन विभागाकडून भरारी पथकाच्या माध्यमातून नुकतीच मोहीम राबवण्यात आली. 1 हजार 16 वाहनांवर कारवाई करण्यात आली.वेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग, सिटबेल्ट, प्रवेश निषेध असताना प्रवेश करणे, मोबाईल वर बोलणे,वैध कागदपत्रे नसने, ओव्हरलोड, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहू नेणे अशा वाहनचालकांवर आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून 23 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मागील महिन्यांपासून द्रुतगती महामार्गावर  अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाच्या  वेगावर नियंत्रण महत्त्वाचे आहे. वेगमर्यादा व लेन कटिंगचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास व लेन कटिंगचा मोह टाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्‍चित मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे मत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले.


द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी करण्यासंदर्भात  दंडात्मक कारवाईचा सुरू केल्याने वाहनांची वेग मर्यादा ताशी 100 आणण्यात यश आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली असल्याचेही पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

95 − = 90