20210717 040030
अलिबाग कर्जत कोकण खालापूर ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र रायगड सामाजिक सुधागड- पाली

पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….

पशुपालकांनो समजून घ्या….
जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….

विशेष लेख✒️
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी तातडीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड कार्यक्षेत्रातील आवास व किहीम तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रातील वरसोली (epicenter) या संसर्ग केंद्रापासून 10 कि.मी. परिसर हा बाधित क्षेत्र (infected zone)म्हणून घोषित केला आहे. तसेच बाधित क्षेत्रातील जनावरांच्या शेडचे निर्जंतुकीकरण करून 10 कि.मी. परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
प्रादूर्भाव भागातील जनावरांच्या व त्यांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालींवर बंधने आणण्याच्या तसेच प्रादूर्भाव भागातील 10 कि.मी. परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शन इत्यादीवर बंदी आणण्याच्या दृष्टीने वरील 10 कि.मी. परिघातील गाव परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर “लंपी त्वचा रोग” काय आहे, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तर मग समजून घेऊ या “लंपी त्वचारोग” या लेखाद्वारे….!

लंपी त्वचा रोगाचा परिचय :-
•हा रोग गाई म्हशींना विषाणूमुळे होतो. या रोगात गाई म्हशींच्या त्वचेवर 1 ते 5 सें.मी. व्यासाच्या गाठी येतात. चावणाऱ्या माशा, डास, गोचिड, किटक, चिलटे इ. बाह्य परोपजीवी या रोगाचा मुख्य:त्वे प्रसार करतात.
•लंपी त्वचा रोग हा सन 1929 ते 1978 या काळात मुख्यत्वे आफ्रिकेत आढळत होता. नंतर हळूवारपणे हा रोग आजूबाजूच्या देशांत प्रसार झाला.
•या रोगाचा युरोप व आशिया खंडात जलदगतीने प्रसार होत आहे.
•भारतात लंपी त्वचा रोग ऑगष्ट 2019 मध्ये ओरिसा राज्यात आढळून आला. त्यानंतर झारखंड,पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश,कर्नाटक व केरळ राज्यात या रोगाचा प्रसार झालेला आहे.
• महाराष्ट्रात सिरोंचा, जि. गडचिरोली येथे मार्च 2020 पासून हा रोग आढळून आला आहे.
•या रोगाचे पक्के निदान राष्ट्रीय रोग निदान प्रयोगशाळा भोपाळ येथे करण्यात आलेले आहे.

लंपी त्वचा रोगाची लक्षणे:-
•बाधित जनावर साधारण 2 ते 5 आठवडे लंपी त्वचा रोगाची कोणतीही बाह्य लक्षणे दाखवित नाही. याला रोगाचा सुप्त काळ म्हणतात.
•या आजारात जनावरास प्रथम तीव्र स्वरुपाचा ताप येतो. त्यानंतर डोळ्यातून अश्रू व नाकातून स्त्राव सुरु होतात.
•लसिकाग्रंथींना (लिम्फ नोड्स) सूज येते.
•जनावराची भूक व तहान मंदावत जाते व दुग्ध उत्पादन कमी होते.
•डोके, मान, पाय, छाती, पाठ, मायांग, कास, इ. भागावरील त्वचेवर हळू हळू 1 ते 5 सें.मी. व्यासाच्या गाठी येतात.
•काही वेळा तोंडात, नाकात व डोळ्यात व्रण येतात.
•तोंडातील व्रणांमुळे जनावरास चारा चघळण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो.
•डोळ्यांतील व्रणांमुळे चिपडे येउन पापण्या चिकटून दृष्टी बाधित होते.
•या आजारात जनावराला फुफ्फुसदाह, स्तनदाह देखील होतो. यामध्ये फुफ्फुसदाहामुळे जनावराला श्वसनास त्रास होतो व धाप लागते.
•रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स पेशी कमी होतात, यामुळे जनावरास अन्य जीवाणूजन्य आजार होवू शकतो.
•पायावर सूज आल्याने जनावर लंगडते.
लंपी त्वचा रोगाचा प्रसार:-
•लंपी त्वचा रोगाचे विषाणू चावणाऱ्या माशा (उदा. स्टोमॉक्सिस), गोचिड, चिलटे (उदा. क्युलिकॉईडस्स) यांच्यामार्फत एका जनावराकडून दुसऱ्या जनावराच्या शरीरात प्रवेश करतात, त्यामुळे या रोगाचा वेगाने प्रसार होतो.
•निरोगी जनावराचा रोगी जनावराशी स्पर्श आल्याने देखील रोगाचा प्रसार होतो.
•रोगी जनावराच्या नाकातील, डोळ्यातील, तोंडातील, गर्भपात झालेल्या जनावराचे गर्भाशयातले स्त्राव इ. मध्ये विषाणू असतात. हे स्त्राव पाणी, चारा व खाद्य दूषित करतात. अशा दूषित चारा, पाणी व खाद्यामार्फत देखील या रोगाचा प्रसार होतो.
•त्वचेवर आलेल्या गाठींचे रुपांतर जखमेत होते. कालांतराने जखम सुकते व जखमेची खपली गळून पडते. अशा खपलीत अंदाजे 5 ते 6 आठवडे विषाणू जिवंत राहतात.
•रोगी नराच्या वीर्यात विषाणू आढळून येत असल्याने अशा नराचा संयोग आल्याने देखील मादीत रोगाचे संक्रमण होऊ शकते.
•गाभण जनावराचा या रोगात गर्भपात होऊ शकतो व जन्माला येणाऱ्या वासरास देखील रोगाचे संक्रमण होऊ शकते.
•दूध पिणाऱ्या वासरास आजारी गायीच्या दुधातून अगर स्तनावरील जखमेतील स्रावातून देखील रोगाचे संक्रमण होऊ शकते.

लंपी त्वचा रोगाची कारणे व प्रादूर्भाव :-
•हा विषाणूजन्य साथीचा आजार असून या आजारात गाई-म्हशीला ज्वर व त्वचेवर गाठी दिसून येतात.
•या रोगाचा प्रसार चावणाऱ्या माशा, डास, गोचिड, किटक, चिलटे इ. बाह्य परोपजीवींकडून एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होतो.
•या रोगाचे विषाणू देवी कुटंबातील व कॅप्रीपॉक्स जातीचे असतात.
•लंपी त्वचा रोग गाई- म्हशींना होतो परंतु शेळ्या मेंढ्यांना होत नाही.
•या रोगाची तीव्रता पाठीवर वशिंड असलेल्या ( झेबू वंश उदा. भारतीय गोवर्ग) गोवर्गात कमी असते तर पाठीवर वशिंड नसलेल्या ( युरोपियन वंश उदा. जर्सी, हॉस्टेन फ्रझियन गोवर्ग) गोवर्गात जास्त असते.
•लंपी त्वचा रोग सर्व वयोगटातील ( नर व मादी) जनावरांत आढळतो. परंतु लहान वासरांत प्रौढ जनावरांच्या तुलनेत प्रमाण जास्त असते.
•उष्ण व दमट हवामान, शेती, गवत व पाण्याची डबकी यामुळे परोपजीवी चावणाऱ्या किटकांची वाढ होते. अशा वेळी या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो.
•लंपी त्वचा रोगाचा दर 10 ते 20 टक्के तर मृत्यूदर 1 ते 5 टक्के असतो. काही वेळा रोगाचा दर 45 टक्के पर्यंत देखील आढळून आला आहे.
•लंपी त्वचा रोगात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावर अशक्त होत जाते, त्याचे दुग्ध उत्पादन कमी होते, ओढकाम करु शकत नाही, गाभण जनावराचा गर्भपात होऊ शकतो. यामुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान होते.
लंपी त्वचा रोगाचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी गोळा करावयाचे नमुने :-
•2 ते 3 मिलीलिटर रक्तजल 4° सें.ग्रेड तापमानात (बर्फावर),
•इडीटीए मिश्रीत 5 मिली रक्त 4° सें.ग्रेड तापमानात (बर्फावर),
•त्वचेवरील गाठीचा नमुना अगर त्वचेवरील जखमेवरील खपली व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडीयम / फॉस्फेट बफर सलाईन मध्ये 4° सें.ग्रेड ते 20° सें.ग्रेड तापमानात (बर्फावर)
•नाकातील, डोळ्यातील, तोंडातील व्रणाचा स्वॅब व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडीयम/फॉस्फेट बफर सलाईन मध्ये 4° सें. ग्रेड तापमानात (बर्फावर),
•वीर्य व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडीयम / फॉस्फेट बफर सलाईन मध्ये 4° सें. ग्रेड तापमानात (बर्फावर)
•प्रयोगशाळा तपासणी आर.टी.पि.सी.आर.
औषधोपचार :-
•लंपी त्वचा रोगाची लक्षणे दिसणारे जनावर आढळून आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून जनावरावर उपचार करुन घ्यावेत.
•पशुवैद्यकाकडून ज्वरनाशक, सूज कमी करणारे व वेदनानाशक औषध जनावरास टोचून घ्यावे.
•जनावरास जीवाणूजन्य रोगाचा दुय्यम संसर्ग होऊ नये म्हणून पशुवैद्यकाकडून प्रतिजैवक औषध टोचून घ्यावे.
•त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास, जखमेत अळ्या पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाकडून औषधोपचार करुन घ्यावेत व जखमेवर मलम लावावे.
लंपी त्वचा रोगाचे नियंत्रण :-
•या रोगाचा प्रादूर्भाव सहसा मानवास होत नाही. बाधित जनावर हाताळणाऱ्या पशुवैद्यकाने, शेतकऱ्याने जैव सुरक्षा साधनांचा उपयोग करावा. हातात रबरी हातमोजे घालावेत.
•बाधित जनावराच्या दुधाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. दूध नेहमीच उकळून थंड केल्यावर पिण्यास वापरावे. दूध पाश्र्चराईझ करुन वापरावे.
•साबण, डेटॉल, अल्कोहोल मिश्रीत निर्जंतुकीकरण द्रावणाचा हात निर्जंतूकीकरण करण्यासाठी वापर करावा.
•गोठा परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही, दुर्गंधी होणार नाही व किटक येणार नाहीत, यासाठी दक्षता घ्यावी.
•शेण खोल खड्यात अगर गोबर गॅस टाकीत टाकावे.
•गोमूत्र शोषखड्यात सोडावे.
•किटकनाशकांचा जनावरांवर, गोठ्यात व परिसरात वापर करावा.
•आजारी जनावरांना व त्यांच्या संपर्कातील जनावरांना आयवरमेक्टीन इंजेक्शन दिल्याने किटकांचे नियंत्रण होते. परिणामी या रोगाचे नियंत्रण होते, असे दिसून आलेले आहे.
•सद्य:स्थितीत भारतात लंपी त्वचा रोगाची लस उपलब्ध नाही. मात्र शेळ्यांसाठी वापरली जाणारी कॅप्रिपॉक्स (उत्तर काशी स्ट्रेन) लस वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते.
•साथरोग सुरु असताना बाधित गावात व 5 कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्रातील गावात लसीकरण करण्यात यावे. •केवळ निरोगी जनावरासच लसीकरण करावे. लसीकरण करताना प्रत्येक जनावरासाठी नवीन सुई वापरावी.
•आजारी जनावराचे निरोगी जनावरांपासून विलगीकरण करावे.
•आजारी व निरोगी जनावरे एकाच ठिकाणी चरावयास अगर पाण्यावर सोडू नयेत. •डास, चावणाऱ्या माशा, चावणारे किटक इ. दूर करणारी अनेक नैसर्गिक औषधे व फ्लाय फ्रायर यंत्र यांचा वापर करावा.
•गोठ्यात पहाटे व सायंकाळी डास मोठ्या प्रमाणात शिरकाव करतात, अशा वेळी मडक्यात सुके शेण जाळून धूर करावा. निलगिरी तेल, कापूर, भांबरुड झुडूपाची पाने, करंज तेल, कडूनिंब तेल, गवती चहाची पाने इ. चा वापर केल्यास डास गोठ्यातून दूर पळून जातात.
•जनावरांना चरायला सोडण्यापूर्वी अंगावर करंज तेल, कडूनिंब तेल लावल्यास किटक चावत नाहीत.
•साथ रोग सुरु असताना महिषवर्गीय जनावरे गोवर्ग जनावरांपासून स्वतंत्र बांधावीत.
•साथ रोग सुरु असताना 10 कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्रातील जनावरांचे बाजार बंद करावेत, जनावरांचे मेळावे व प्रदर्शने आयोजित करु नयेत.
•बाधित क्षेत्रातील जनावरांचे गोठे, परिसर, खाद्य भांडी, पाणी भांडी, हत्यारे, यंत्रसामुग्री, योग्य औषधी उदा. 20 टक्के इथर, 1 टक्के क्लोरोफॉर्म, 1 टक्के, फॉरमॅलिन, 2 टक्के, फिनॉल, 2 टक्के सोडियम हायपो क्लोराईड, आयडीन द्रावण, क्वार्टरनरी अमोनिया द्रावण इ. चा वापर करुन निर्जंतूक करावी.
•या रोगाची लक्षणे दिसणारे जनावर आढळून आल्यास पशुपालकाने, ग्रामसेवकाने, तलाठ्याने, लोकप्रतिनिधीने अगर गावातील अन्य कोणत्याही व्यक्तीने याची खबर तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकाला द्यावी. म्हणजे तातडीने पशुवैद्यकीय उपचार करणे, रोगाचे निश्चित निदान करणे, रोग नियंत्रणात आणणे, रोगाचा प्रसार रोखणे इ.कार्यवाही करणे शक्य होईल.
•या रोगांत मयत झालेले जनावर 8 फूट खोल खड्यात शास्त्रोक्त पद्धतीने दफन करावे.
या रोगाची संपूर्ण माहिती जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आकाशवाणी, दूरध्वनी, वर्तमानपत्र, भित्तीपत्रके, घडीपत्रिका, पशुपालकांचे मेळावे इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बाधित क्षेत्रातील 5 कि.मी. परिसरातील सर्व जनावरांना “गोट पॉक्स” लसीकरण तात्काळ करण्यात यावे, याकरिता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले  यांनी योग्य ते नियोजन करून जनावरांचे 100% लसीकरण तातडीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तसेच जिल्हा प्रशासनाकडून जनावरांसाठी करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष मस्के व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी केले आहे
– मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग