20200330 071207
ताज्या रायगड सामाजिक

सुरु असलेल्या कंपन्यांनी काम नसलेल्या कामगारांना
माणुसकीच्या भावनेतून तात्पुरत्या स्वरूपात काम द्यावे
– जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी

अलिबाग/ प्रतिनिधी :
जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग घोषित केला आहे.  करोन विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.

जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या इतर भागातून व अन्य राज्यांमधून कामानिमित्त आलेले कामगार आहेत त्यातील काही कामगार संचारबंदी लागू होण्यापूर्वी आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. परंतु काही कामगार हे जिल्ह्यात अडकून पडलेले आहेत.   जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे कामगार आपल्या मूळ गावी जाऊ शकलेले नाहीत. शिवाय हे कामगार ज्या ठिकाणी काम करीत आहेत त्या कंपन्यादेखील बंद आहेत.  प्रशासनाकडून या कामागारांच्या जेवण्याचा व राहण्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत त्यांना कोणतेही काम नाही.
या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत चालू असणाऱ्या कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकताही असल्याने तालुक्यात आढळून येणाऱ्या कामगारांशी समन्वय साधून, या काम नसलेल्या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून अशा सुरु असलेल्या कंपन्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम देण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी या कंपन्यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + 2 =