स्व.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान सन 2020-21 अंतर्गत वृक्षलागवड मोहीम संपन्न
अलिबाग/ जिमाका :
स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान 2020-21 अंतर्गत विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण रायगड-अलिबाग यांच्या अधिनस्त वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण, अलिबाग यांच्यामार्फत नुकतेच मौजे चोरंढे गावातील खेळाच्या मैदानाभोवती वृक्ष लागवड हरित महाराष्ट्र अभियानाची सुरूवात करण्यात आली.
गृप ग्रामपंचायत मापगावचे उपसरपंच वसीम कूर व ग्रामपंचायत सदस्य श्री.सचिन घाडी यांच्या उपस्थितीत बहावा वृक्षाचे रोपण करून या माेहिमेची सुरूवात करण्यात आली.
या कार्यक्रमास श्री. अप्पासाहेब निकत, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, रायगड-अलिबाग, श्री.रमाकांत माया म्हात्रे, सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण रायगड अलिबाग, सौ.गायत्री गणेशकुमार पाटील, वनक्षेत्रपाल,सामाजिक वनीकरण परिक्षेत्र,अलिबाग व विभागीय तसेच परिक्षेत्रातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. चोरंढे गावाच्या खेळाच्या मैदानासभोवती वनपरिक्षेत्र सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अलिबाग यांच्यामार्फत एकूण 200 रोपांची लागवड करण्यात येणार असून यावेळी पहिल्या टप्प्यात 33 रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये बहावा व अशोक या झाडांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात मैदानाच्या सभोवताली आंबा, चिंच, बदाम, शिसू, निम, हिरडा, बेहडा, वड, पिंपळ, पेरू व सिताफळ यासारख्या स्थानिक प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लायन्स क्लब मांडवा विभागाचे सदस्य व गृपग्रामपंचयात मापगाव ग्रामस्थांचे बहुमूल्य सहकार्य लाभलेे.