Img 20200721 Wa0010
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर ! पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा

खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर !

पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा

● मोठी दुर्घटना घडण्याची दिसत आहेत चिन्हे ?

● हाय टेन्शन विदयुत वाहिनीच्या बाजूलाच टॉवरचे बांधकाम

● विना परवानगी बांधकामाला वरदहस्त कोणाचा ?

—————————–
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशा कोणत्याही प्रकारची परवानगीची माहिती माझ्यापर्यंत आली नसून असले बेकायदेशीर कामांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
– दशरथ भंडारी, प्रभाग अधिकारी,
प्रभाग -(अ), पनवेल महानगरपालिका
———————–

सध्या लॉकडाऊनमुळे पालिकेकडून परवानगी अडकलेली आहे, आम्ही आमची फाईल परवानगीसाठी पालिकेत जमा केली आहे.
– संतोष पारवे,
विकासक तथा रचनाकार
—————————-

पनवेल/ राज भंडारी :
पनवेल महानगरपालिका हद्दीमधील खारघर प्रभागातील इनामपुरी गावामध्ये एका खासगी जमिनीवर हाय टेन्शन विद्युत वाहिनीच्या बाजूलाच मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. यावेळी या मोबाईल टॉवर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप पालिकेची परवानगी प्राप्त झाली नसल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. यावरून विना परवानगी बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केल्याचे समोर आले आहे. मात्र नव्याने पदभार स्वीकारलेले पालिका आयुक्त अपयशी ठरल्याच्या वावड्या उठत असताना मात्र बेकायदेशीर कामांकडे दुर्लक्ष करण्यात माहीर तर नाहीत ना ? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला हदरवून सोडले. याच कामात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या, त्यामुळे प्रशासकीय कामातील इतर परवानग्या अथवा तत्सम कामे बाजूला राहिली आहेत. मात्र नियम आणि नियमांची सांगड घालूनच परवानग्यांची कामे होत असतात. मात्र खारघर येथील इनामपुरी गावात एका खासगी जागेवर विना परवानगी झाडांची कत्तल करून पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत संबंधित पालिका प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांच्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नसून अशा पद्धतीने बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई ही केलीच जाणार आहे.
मोबाईल टॉवर उभे करीत असताना या प्रकारच्या माफियांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हातचे बाहुले बनविले असल्याचेच त्यांच्या बोलण्यातून जाणवले. यावेळी ज्य अधिकाऱ्यांनी येथील खासगी जागा मालक यांच्याशी व्यवहार केला त्या श्री. दुबे यांच्याकडे विचारणा केली असता, सदर बाबत माहिती देण्यावरून त्यांनी आपले हात वर करीत माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र अवघ्या काही तासातच या कंपनीच्या परवानगी घेणाऱ्या आणि जागेबाबत काम करणाऱ्या संतोष पारवे यांच्याशी संपर्क झाल्यानंतर सत्य समोर आले. यावेळी संबंधितांशी परवानगीची प्रत मागितली असता, परवानगी नसल्याचे त्यांनी मान्य करून प्रशासनाच्या अर्थात पालिकेच्या डोळ्यात कशी धूळ फेकली याचे उत्तम उदाहरण त्यांनी समोर ठेवले. यावेळी हाय टेन्शन विद्युत वाहिनीबाबत विचारणा केली असता निष्काळजीपणे काहीही होत नाही असे उत्तर देऊन आपण किती बेजबाबदार आहोत याची त्यांनी प्रत्यक्ष प्रचिती दिली.
एका बाजूला पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त असताना अशा मुजोर धनदांडग्या कंपन्या प्रशासकीय नियम धाब्यावर बसवत आहेत. एका बाजूला पालिकेच्या परवानगी शिवाय झाडांची कत्तल आणि दुसऱ्या बाजूला त्याच ठिकाणी मोबाईल टॉवरचे बांधकाम केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे विना परवानगी बांधकाम करणाऱ्याना अभय देण्यामागे पालिका आयुक्तांची काही खेळी तर नाही ना ? असे प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 78 = 79