सैनिकी शिक्षणासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून ५० हजारांची आर्थिक मदत
पनवेल/ प्रतिनिधी :
सांगली येथे सैनिकी शिक्षण घेत असलेल्या पनवेलमधील आयुष गुरुप्रसाद मार्गी याला शिक्षणासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सदरचा धनादेश नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते आयुषच्या पालकांकडे आज (दि. २२) सुपूर्द करण्यात आला.
पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील सोळा वर्षीय आयुष मार्गी हा सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी येथील आदर्श करिअर अकॅडमीमध्ये अकरावी सायन्स व आर्मीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नगरसेविका दर्शना भोईर यांच्या मार्फत त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंडळाच्या माध्यमातून आयुषला शिक्षणासाठी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या बहुमोल मदतीबद्दल मार्गी कुटुंबीयांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, मंडळाचे सचिव परेश ठाकूर तसेच नगरसेविका दर्शना भोईर यांचे आभार मानले.