20220624 103522
अलिबाग उरण कर्जत कल्याण खारघर खालापूर ताज्या मुंबई रायगड

खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी

खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी

पनवेल/ प्रतिनिधी :
सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर से. १८ मध्ये जाते तसेच खारघर से. १८ कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना त्याचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने खारघर से. १८ डी मार्ट कडून खारघर सेक्टर ११ येथे कोपरा ब्रिजकडे खाली उतरणाऱ्या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक विभागाकडून रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्रीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
हिरानंदानी ब्रिजपासून काही अंतरावर असलेल्या कोपरा ब्रिज पुलाखालून खारघर से. १८ मध्ये जाणाऱ्या व खारघर सेक्टर १८ मधून कोपरा गाव व पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीमुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. काही कारणांमुळे सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रीजवरील वाहतूक बंद पडल्यास खालून जाणाऱ्या वाहतुकीत वाढ होऊन पनवेलकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना याचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने खारघर से. १८ कडून कोपरा ब्रिजजवळ खाली उतरणाऱ्या रस्त्यावर कायमस्वरूपी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक नियंत्रण विभागाने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग ठेवला आहे. त्यानुसार डी-मार्ट सेक्टर १८ कडून कोपरा गाव येथे जाण्यासाठी कोपरा ब्रिजजवळील सर्व्हिस लेनवरून कळंबोली सर्कल तेथून यूटर्न घेऊन कोपरा गाव येथे जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. तसेच खारघर सेक्टर १८ येथील रहिवाशांना पुणेकडे जाताना वरील प्रमाणेच कोपरा ब्रिजजवळून खाली उतरून जाण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी बँक ऑफ इंडिया चौकातून हिरानंदानी ब्रिजखालून जाण्याचा पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो एण्ट्री असल्याची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी मंगळवारी काढली. सदरची अधिसूचना पुढील आदेशापर्यंत अमलात राहणार आहे. ही अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 3 = 2