IMG-20221101-WA0004
अलिबाग उरण कर्जत कोकण ठाणे पनवेल पेण महाराष्ट्र रायगड सामाजिक

एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी… 3 नोव्हेंबर रोजी पनवेल बस स्टँड समोर लाक्षणिक उपोषण…

एक हाक प्रवाशांच्या सोयीसाठी…

3 नोव्हेंबर 2022 रोजी पनवेल बस स्टँड समोर लाक्षणिक उपोषण…

पनवेल/ प्रतिनिधी :
गेली 14 वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडलेल्या पनवेल एसटी स्थानकाच्या प्रकल्प उभारणी करता पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून एल्गार पुकारत आहे. राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातून प्रवास करणे म्हणजे एक जिकरीचे काम आहे. येथील कर्मचारी वर्ग देखील जीव मुठीत घेऊन मोडकळीस आलेल्या इमारतीत काम करत आहे. कोकण आणि मुंबई विभागांना जोडणारे अत्यंत महत्त्वाचे स्थानक जर दुर्लक्षित असेल तर बाकी स्थानकांच्या बाबतीत विचार करणे देखील दुरापास्त होईल.
बांधा व हस्तांतरित करा या धर्तीवरती महाराष्ट्रात पाच स्थानके प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यासाठी निवडले गेले आहेत. त्यामध्ये पनवेल स्थानकाचा समावेश झालेला आहे. दुर्दैवाने त्यानंतर मात्र काम तसूभर देखील पुढे सरकलेले नाही. सदरचे काम मार्गी लागण्यासाठी पनवेल प्रवासी संघाच्या माध्यमातून 3 नोव्हेंबर 2022 रोजी लाक्षणिक उपोषणाचे संविधानिक हत्यार उपसले आहे.

IMG-20221101-WA0004

पनवेल एसटी स्थानकाचा आराखडा २०१८-१९ मध्ये जाहीर करण्यात आला होता.तत्पूर्वी २००९ साली धोकादायक परिस्थितीत असल्याचा ठपका ठेवून स्थानकातील संकुल पाडण्यात आले होते. नूतन आराखड्यानुसार शहरातील १७ हजार ५०० चौरस मीटर भूखंडावर असणाऱ्या पनवेल एसटी स्थानकाच्या जागेवर अद्ययावत बसस्थानक उभारण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला होता. सुरुवातीला स्थानकाचा विकास ‘बांधा आणि वापरा’ या तत्त्वावर करण्यात येणार होता; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महामंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत स्थानकाच्या विकासासाठी पनवेल मास ट्रान्झिट कंपनीच्या टेंडरला २०१८-१९ मध्ये मान्यता देण्यात आली होती.कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार स्थानकाचा आराखडा तयार करून पुढील मान्यतेसाठी पनवेल महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला; मात्र या आराखड्यात पालिकेच्या विभागाकडून अनेक दुरुस्त्या सूचवण्यात आल्या होत्या. नवा आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्याने संबंधित कंपनीला एका महिन्याच्या आत नवा आराखडा महापालिका व इतर विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

adivasi logo new 21 ok (1)

सध्या पनवेल एसटी स्थानकाकडे ८.५० एफएसआय भूखंड उपलब्ध आहे. या भूखंडापैकी ५० टक्के एफएसआयवर बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर एसटी कार्यालय व व्यावसायिक बांधकाम अपेक्षित आहे.
असे सगळे असले तरी देखील प्रत्यक्ष कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. या सगळ्या प्रक्रियेचा पनवेल प्रवासी संघ अगदी सुरुवातीपासून पाठपुरावा करत आलेला आहे. संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली होणारे आंदोलन हे संपूर्णपणे बगैर राजकीय असणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बबन दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुदाम गोकुळशेठ पाटील, काँग्रेस पक्षाचे महेंद्र शेठ घरत, अभिजीत पांडुरंग पाटील आदी राजकीय नेत्यांनी पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनास संपूर्णपणे पाठिंबा दर्शविला असून ते आपापल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे समजते.